माळवाडी

वनसंपदा-

लिफ्ट एरिगेशन द्वारे सर्वत्र पाणी पोहचल्यामुळे प्रत्येकाच्या बांधाला नारळ, सागवान, लिंब, आंबा. इ. झाडांची मोठया प्रमाणात लागवड झाली आहे. गावाच्या दक्षिणेस नविन शिवाजीनगर नावाच्या माळवाडी गावाचाच एक भाग वसलेला आहे. तेथे प्रत्येक घरी व प्रत्येकाच्या प्लॉटवरती नारळ, आंबा, चिकू, सागवान, इ. झाडांची लागवड केली आहे. त्यामुळे तो भाग वनराईने नटल्यासारखा दिसतो.

स्वच्छता-

स्वच्छतेसाठी नेहमीच गाव आग्रही आहे. संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियानामध्ये गावाने सातत्याने सहभाग घेतला आहे व बक्षिसही मिळविले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी गावात स्वच्छता मोहिम राबविली जाते. पावसाळयात डासांच्या प्रादुर्भाव होऊनये म्हणून औषधे फवारणी केली जातात. पिण्याच्या पाण्यासाठी उत्तम सोय आहे. पाणी दररोज शुध्दीकरण करूनच सोडले जाते. परिणामी पावसाळी आजाराची लागण होत नाही. गावात भारती विद्यापीठ, आदर्श शाळेतील व जि.प. शाळेतील विद्यार्थी वेळोवेळी परिसराची स्वच्छता करतात.

जलस्त्रोत-

गावाच्या पश्चिमेला दोन ते तीन किलोमीटर अंतरावरून बारमाही कृष्णा नदी वाहते त्यामुळे लिफ्ट एरिगेशनद्वारे शेतीला पाणी पुरविले जाते. तसेच गावाच्या हद्दीतील शेतीमधून कॅनॉल गेला आहे. गावामध्ये २०० हून अधिक विहिरी, बोअरवेल आहेत. शेतीसाठी बारमाही जलसिंचनाची सोय असलेमुळे गाव हिरवेगार व धनधान्याने समृध्द आहे.